लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा : तालुक्यात मागीलवर्षी चांगल्या प्रमाणात झालेल्या पावसाच्या भरोशावर किन्हीराजासह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. आता भुईमुग काढणीला सुरूवात झाली असून या कामासाठी मात्र मजूर मिळेनासे झाले आहेत. परिणामी, सर्व कामे सोडून शेतकऱ्यांना गावोगावी भूईमुग काढण्यासाठी मजूरांचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. किन्हीराजा परिसरात सोनल प्रकल्प तसेच गतवर्षी नव्याने बांधण्यात आलेल्या चोरद व मैराळडोह या सिंचन प्रकल्पांवरून परिसरातील सोनाळा, मैराळडोह, एंरडा, गिव्हा, चोरद, आदी गावातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पाईप लाईनव्दार आपल्या शेतात सिंचनाकरिता पाणी घेतले. गेल्यावर्षी तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे वरील तिन्ही जलप्रकल्प तुटूंब भरले होते. याच जलप्रकल्पाच्या भरोशावर या परिसरातील श्ोतकऱ्यांनी गहू, हरभरा या रब्बी पिकानंतर मोठया प्रमाणात उन्हाळी भुईमुंग पेरणी केली होती. पेरणी केलेल्या भुईमुंग पिकाचा कार्यकाळ संपला असून आता ते काढणीला आले आहे. परंतू सर्वच शेतकऱ्याचे पिक एकाचवेळी काढणीला आले असल्याने शेतकऱ्यांना भुईमुग काढणीकरिता मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतमजुराच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. किन्हीराजा येथील युवा शेतकरी प्रताप भुजंगराव घुगे व विष्णू प्रकाशराव घुगे यांनी महेकर तालुक्यातील आस्टूल-पास्टूल तसेच वाशिम तालुक्यातील अनसिंग, ब्रम्हा, लईकुंभी, पिंपळगाव मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी दलेलपूर, पाळोदी, तसेच मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा कवरदरी, पिंपळखेडा, जोगदलदरी, गिव्हा आदी कितीतरी गावात मजुराच्या शोधात गेलो असता तिथेही आम्हाला मजूर मिळाले नाही, अशी माहिती दिली. यावर्षी मान्सून वेळेवरच येणार असल्याने हाती आलेला घास मजूरांअभावी तोंडात जाण्यापुर्वीच हिरावल्या तर जाणार नाही ना, अशी भिती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.
किन्हीराजा परिसरात शेतमजुरांची वानवा; शेतकरी त्रस्त
By admin | Published: May 22, 2017 1:20 AM