वाशिम - पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या पाच एकर शेतात कमी वेळेत भरघोस उत्पन्न देणा-या शेवग्याची लागवड मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. येत्या वर्षभरात त्यापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार असून, एका एकरातून किमान १ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास इंगोले यांनी व्यक्त केला आहे. शेवगा हे सर्वाच्या परिचयाचे भाजीपाल्याचे झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येते. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. या झाडांच्या शेंगांची भाजी, पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन-आॅईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून, तर बियांची पावडर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते.बियांपासून बनविलेल्या बेनआॅईलचा वापर घडय़ाळे व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी महेंद्र इंगोले यांनीही त्यांच्या ५ एकर क्षेत्रात तीन महिन्यांपूर्वी शेवग्याची लागवड केली आहे. योग्य देखभालीमुळे या पिकाची वाढ चांगली झाली असून, येत्या वर्षभरात या झाडांपासून शेंगाचे उत्पादन होऊ शकणार आहे. या पिकातून एकरी १ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास इंगोले यांनी व्यक्त केला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेतक-याने केली शेवग्याची शेती,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 5:58 PM