लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, या योजनेत शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असले तरी, लागणारा खर्च एक लाखापेक्षा अधिक होत असल्याने शेतकरी आता या योजनेबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत चार वर्षांच्या कालावधित जिल्ह्यात केवळ १३७१ शेततळ्यांची कामे होऊ शकली आहेत. दरम्यान, उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाची धडपड पुन्हा सुरु झाली आहे.राज्यात पावसाची अनियमिततेमुळे शेतकºयांना खरीप आणि रब्बी हंगामातही पाण्याअभावी मोठे नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ९ फेब्रुवारी, २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना मंजूर करून महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतुद करण्यात आली. शेततळयाची मागणी करणाºया अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात मोठया आकारमानाचे शेततळे ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल, तर सर्वात कमी १५ मीटर लांब, रूंद आणि ३ मीटर आकारमानाचे आहे. ३० मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल आकारमानाच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे. इतर शेततळयासाठी आकारमानानुसार अनुदान देय असून, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांला स्वत: खर्च करावा लागतो. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या योजनेच्या पहिल्याच वर्षी शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सहा तालुक्यात मिळून ४८४ शेतकºयांनी शेततळे खोदले; परंतु त्यानंतर आजवरच्या तीन वर्षांत योजनेंतर्गत अर्ज करून मंजुरी मिळाल्यानंतरही खर्च अधिक लागत असल्याने शेतकरी या योजनेकडे पाठ करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत सहाही तालुक्यात मिळून केवळ ८८७ शेततळ्यांची कामे होऊ शकली असून, जिल्ह्यात आजवर १३७० शेततळी पूर्ण झाली आहेत.
शेततळ्याच्या योजनेसाठी राज्यभरात अनुदानाबाबत सारखेच निकष आहेत. प्रत्यक्षात राज्यातील विविध भागांतील जमिनीचे प्रकार किंवा स्तर भिन्न आहेत. वाशिम जिल्ह्यात चार ते पाच फुटावरच कठीणस्तर लागतो. परिणामी, खोदकामाला अडचणी येऊन निर्धारित अनुदानात शेततळ्याचे खोदकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात या योजनेबाबत शेतकरी उदासीन असल्याचे दिसते.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम