मानोरा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी सोयाबीनची पेरणी केली जाते. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी महाबीजचे प्रमाणिक बियाणे मिळावे, याकरिता आभासी पद्धतीने नोंदणी केली. तालुका कृषी विभाग मात्र अनुदान, परमीटच्या मायाजालात शेतकऱ्यांना अडकवून ठेवत असून, बियाणे उपलब्ध करून देत नसल्याचे शेतकरी परिवर्तन संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून बाळगण्यात आलेल्या दिरंगाईचा गैरफायदा घेऊन खासगी बियाणे, खत विक्रेते व्यापारी अधिक दराने इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे दिसून येत आहे.
तथापि, आधीच विविध स्वरूपातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेचे मनोहर राठोड यांनी केली आहे. यासंदर्भात प्रभारी तालुका कृषी अधिकारी सोनटक्के यांना संपर्क साधला असता, त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.