‘धरणाचे पाणी अडवा’: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणीवाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. धरणाचे काम त्वरित पूर्ण करुन धरणाचे पाणी अडविण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह शिरपूर, मिर्झापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर २५ एप्रिल रोजी धडक देवून मागणी केली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.लघु पाटबंधारे मिर्झापूर प्रकल्प गत १४ वर्षांपासून प्रलंबित पडला आहे. केवळ एक ते दोन दिवसात होणारे कामच शिल्लक असतांना याकडे संबधितांकडून दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या नियमानुसार अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सदर काम ३ वर्षामये पूर्ण होणे अपेक्षित असतांना आज रोजी हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या बागा वाळणे, पिण्यासाठी गुरांना भटकंती करावी लागत आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास शासनाच्या पैशातही वाढ होत आहे. याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. सदर प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास यावर्षी येणाऱ्या पावसाळयामध्ये त्या पाण्याचा योग्य वापर होवू शकते. तरी याकडे लक्ष देवून सदर प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून केली. यावेळी गणेश पा. ईरतकर, गजानन निंबाजी गाभणे, रामेश्रर निवृत्ती इरतकर, ओमकार चोपडे, सिताराम बोबडे, सुरेशभाऊ वाळले, गजानन कुटे, दिलीप बाविस्कर, रमेश मंत्री, राजु मंत्री, सुभाष सोमटकर, गजानन भांदुर्गे, सोनु देशमुख, राजु राऊत, संतोष राऊत, सुभाष इरतकर, श्रीराम मोरे, तेजराव सोमटकर, भागवत सोमटकर, रामकिसन सोमटकर, गजानन काळे, ज्ञानेश्वर गावंडे, बंडु मंत्री यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता.मिर्झापूर प्रकल्पाच्या कामाबाबत वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी वारंवार चर्चा करुनही यश न आल्याने अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह धडक देवून सदर प्रश्न प्रशासनाच्या दरबारी आणले आहे. हे काम त्वरित पूर्ण न झाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांसह येवून ठिय्या आंदोलन केल्या जाणार आहे. -गणेश इरतकर, शेतकरी, शिरपूर जैन
शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
By admin | Published: April 26, 2017 1:09 AM