लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कोणतीही उच्च शिक्षणाची परंपरा कुटूंबात नसताना आणि जेमतेम परिस्थितीत वातावरणाची साथही नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आयआयटीला प्रवेश मिळविण्याची किमया वाशिम तालुक्यातील शेतकरी कुटूंबातील मुलाने केली आहे. रवि बालकिसन भुसारी, असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो वाशिम तालुक्याच्या गिव्हा येथील रहिवासी आहे. वाशिम तालुक्यातील गिव्हा येथे बालकिसन भुसारी हे त्यांच्याकडे असलेल्या ७ एकर कोरडवाहू शेतीत राबून आपल्या कुटूंबाचा सांभाळ करतात. कोरडवाहू शेती असल्याने पोट भरण्यापेक्षा फारसे अधिक उत्पन्न त्यांना होत नाही. वृद्ध आई-वडिल, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी, असे त्यांचे कुटुंब आहे. या परिस्थितीतही त्यांनी मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. विशेष म्हणजे त्यांचे स्वत:चे शिक्षण केवळ मॅट्रिकपर्यंत असतानाही त्यांनी मुलांवर शैक्षणिक संस्कार घडविले. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यात त्यांचा थोरला मुलगा रवि यानेही कुठलीच कसर ठेवली नाही. घरात उच्च शिक्षणाची परंपरा नसतानाही त्याने केवळ जिद्द आणि बुद्धीच्या जोरावर आयआयटीपर्यंत झेप घेतली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. या ठिकाणी कठोर परीश्रम करून त्याने जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आणि जवाहर नवोदयमधून उच्च माध्यमिकची परिक्षा देताना ९१. ८० टक्के गुणांसह प्राविण्य प्राप्त केले. आयआयटी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मुंबई येथे मोफत मार्गदर्शन करणाऱ्या शिकवणी वर्गात प्रवेश मिळविला. या ठिकाणी अथक परीश्रम करताना त्याने आयआयटीसाठी आवश्यक असलेल्या जेईई अॅडव्हान्स परिक्षेत इतर मागासप्रवर्गात ३६६ पैकी २१२ गुण पटकावून देशात इतर मागास प्रवर्गातून ८०० वा क्रमांक पटकावला. या यशामुळेच त्याचा आयआयटीसाठी प्रवेश निश्चित झाला. पवई येथे आयआयटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेला त्याला प्रवेश मिळाला. अशी कामगिरी करणारा तो गिव्हा येथील पहिला आणि एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याला यासाठी प्रोत्साहन मिळाले, ते त्याचे आजोब रामराव तुकाराम भुसारी यांचे. तसेच आई-वडिल, शिक्षक, शाळेचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.