शिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या किन्ही घोडमोड येथील विजय प्रल्हाद घोडे (वय २0 वर्षे) या शेतकरी पुत्राने शनिवार, ६ मे रोजी विहिरीमधील कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्राप्त माहितीवरून शिरपूर पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.शिरपूर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या ग्राम किन्ही घोडमोड येथे विधवा महिला शेतकरी कमल प्रल्हाद घोडे ह्या आपल्या दोन मुलांसोबत वास्तव्याला आहेत. यासंदर्भात गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल घोडे यांच्या नावे किन्ही येथे चार एकर शेती असून, पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलांचा सांभाळ करण्यासोबतच शेतमालाच्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा हाकला. गेल्या काही वर्षांंपासून त्यांनी शेतीची जबाबदारी लहान मुलगा विजयवर सोपवली होती. त्यापैकी मोठा मुलगा गजानन हा ऑटो चालवितो; तर मृतक विजय हा शेतीचा कारभार पाहत असे. विजयने मोठय़ा दिमतीने आपल्या शेतात संत्रा पिकाची लागवड केली होती; परंतु यावर्षी पाण्याअभावी सर्व झाडे सुकली. त्यामुळे तो सतत चिंतातूर राहत असे. दरम्यान, विजय हा शनिवारी सकाळी शेतात गेला असता लवकर घरी न परतल्यामुळे त्याचा भाऊ गजानन हा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. यावेळी विजय शेतात आढळून न आल्यामुळे गजाननने त्याचा शोध घेतला असता, विजयचा मृतदेह विहिरीमधील कडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी गावच्या पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी र्मग दाखल करून विजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाकडे पाठविला. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
शेतकरी पुत्राची आत्महत्या
By admin | Published: May 07, 2017 2:06 AM