इंझोरी, दि. १८- जामदरा घोटी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी मधुकर धुरट यांचा एकुलता एक मुलगा योगेश मधुकर धुरट (३२) याने आपल्या राहत्या घरी १६ नोव्हेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा १७ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.जामदरा घोटी शिवारात मधुकर धुरट यांच्या नावाने दोन एकर शेती आहे. ही शेती मागील काही वर्षांपासून योगेश पाहत आहे. योगेशचे वडील व आई हे गंभीर आजाराने ग्रासलेले असल्याने त्यांना कोणतेही काम करता येत नाही. त्यांच्या उपचाराकरिता वारंवार पैसा खर्च करावा लागतो. यासोबतच मागील काही वर्षांपासून शेतामधील नापिकीमुळे बँंकेमार्फत घेतलेले सुमारे ४0 हजार रुपये कर्ज भरल्या गेले नाही. सोबत आजाराकरिता वारंवार होणार्या खर्चाकरिता सावकाराकडूनसुद्धा कर्ज घेतलेले होते. या वर्षालासुद्धा जास्त पाण्याअभावी शेतामधील उडीद पिकाची नासाडी झाली तर सोयाबीन पीकसुद्धा जास्त पाण्यामुळे नाहीसे झाले. केवळ ७५ किलो सोयाबीनचे पीक त्याच्या घरामध्ये आल्याने योगेश हा फार विवंचनेत होता.घरामधील आजाराने ग्रासलेले आई, वडील, पत्नी व लहान-लहान पाच वर्षांंचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी यांचे संगोपन करणे कठीण झाल्याने या विवंचनेत योगेश यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. १७ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ३२ वर्षीय योगेशच्या अकाली निधनाने जामदरा घोटी गावावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी पुत्राची आत्महत्या
By admin | Published: November 19, 2016 2:25 AM