लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे ज्ञानेश्वर भगवान मोहळे (२०) या शेतकरीपुत्राने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर हा १ मार्च रोजी रात्री ८ वाजता घरातून बाहेर गेला होता. तो बराच उशीर घरी परतला नाही. त्यामुळे घरच्या मंडळीने त्याच्या मित्रांकडे चौकशी केली, तसेच गावभर शोध घेतला; परंतु तो आढळून आला नाही. त्यामुळे शिवारानजिक असलेल्या स्वत:च्या शेतात गेला असावा म्हणून नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहिले. त्यावेळी ज्ञानेश्वर हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्ञानेश्वरच्या पश्चात आई-वडील व लहानभाऊ, असा परिवार आहे. वडील भगवान मोहळे यांच्या नाव तीन एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याचे समजते. यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने भगवान मोहळे मोलमजुरी करतात. घरच्या हलाखीमुळे दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर १२ वीनंतर शिक्षण बंद करून वडिलांसोबत मजुरीचे काम करून कुटूंबाला हातभार लावत होता. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास बीट जमादार उत्तम राठोड, शिपाई अमोल पाटील करीत आहेत.
राजुरा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 5:25 PM