दरवर्षीच्या तुलनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनची स्थिती अत्यंत चांगली होती. यामुळे नेहमीच्या तुलनेत अधिक उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागू असतानाच ऐन सोयाबीनची कापणी करून ते शेतात रचून ठेवले असतानाच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के; तर बहुतांश शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दरम्यान, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नियमानुसार ७२ तासांच्या आत ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनीकडे फोटो व माहिती सादर केली. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामेदेखील केले. त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला; मात्र बहुतांश शेतकरी यापासून वंचित राहिले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे विनाविलंब विमा कंपनीने अदा करावे, अशी मागणी होत आहे.
........................
कोट :
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन तसेच तूर व कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तोंडावर खरीप हंगाम असून, शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे. अशाप्रसंगी विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे.
- नितीन उपाध्ये
शेतकरी, काजळेश्वर