वाशिम : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक, कर्मवीर संभाजी महाराज, त्यांच्या मातोश्री महाराणी सोयराबाई राणीसाहेब व छत्रपती थोरले शाहू महाराज यांची "द रिनैसन्स स्टेट' द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र" या इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकात गिरीष कुबेर यांनी अत्यंत विकृत बदनामी केली असल्याचा आक्षेप घेत या पुस्तकावर तत्काळ बंदी आणून कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांनी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामार्फत केली.
" द रिनैसन्स स्टेट' द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र" या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज, सोयराबाई राणीसाहेब व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याबद्दल कुबेर यांनी पान क्रमांक ७६ व इतर ठिकाणी अत्यंत विकृत लिखाण केले असून, सदर लिखाण कोणतेही ऐतिहासिक संदर्भ लक्षात न घेता तर्कहीन व पूर्वग्रह दूषित भावनेतून केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास शेतकरी संघर्ष संघटना वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलने करील व उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशाराही अढाव यांनी निवेदनात दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव हरिदासजी बनसोड, वाशीम तालुकाध्यक्ष संतोषराव इंगोले, शहर कोषाध्यक्ष संजय ताकतोडे, रिठद सर्कल प्रमुख ओम वाघ, सचिव ऋषिकेश चव्हाण, वांगीचे शाखा पदाधिकारी शिवाजी भोयर उपस्थित होते.