दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. सार्वत्रिक पावसाचा अभाव असल्याने पेरण्या संकटात सापडल्या आहेत. त्यात काही भागांतील शेतकरी पुरेशा पावसाची प्रतीक्षा करीत होेते. पावसाची सरासरी खूप अधिक दिसत असली तरी जमिनीत चांगला ओलावाच नसल्याने या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. त्यात आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. कारंजा तालुक्यातील बहुतांश मंडळात पावसाची सरासरी अधिक असूनही पावसाचे प्रमाण सार्वत्रिक नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. धनज बु. महसूल मंडळातील शेतकरी आता पिके वाचविण्यासाठी सिंचनाचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
----------------
घरी ठेवलेले सिंचन साहित्य पुन्हा शेतात
जिल्ह्यात रब्बी हंगामात सिंचनासाठी वापरण्यात येणारे सिंचन साहित्य अवघ्या दीड महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी घरी आणून गुंडाळून ठेवले. आता पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे घरी आणून ठेवले सिंचन साहित्य पुन्हा शेतात नेण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली असून, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच बैलगाडीने शेतात नेण्यात येत असल्याचे चित्र धनज बु. परिसरात पाहायला मिळत आहे. काही शेतकरी पाटाने पाणी सोडून पिके वाचविण्याची धडपड करीत आहेत.
----------------
काही गावांत ७५ टक्केच पेरणी
कारंजा तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली असली तरी धनज बु. परिसरातील धनज बु., धनज खु आदींसह १, १२ गावे वगळता इतर गावांत ७५ टक्केच पेरणी झाली आहे. त्यात बेलखेड, कामठा आदीसंह या गावांच्या सभोवताली असलेल्या गावांचा समावेश आहे. या गावांत पूर्वी आटोपलेली पेरणी संकटात आहेच, शिवाय पावसाअभावी उर्वरित पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, ते दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.