तालुक्यातील वाईगौळ येथील शेतकरी लुंबासिंग भाऊराव चव्हाण आणि मनोहर राठोड यांच्या शेतातील सिंचनासाठी उपयोगात असलेल्या दोन विद्युत मोटरपंप केबलसह अज्ञात चोरट्यांनी २८ डिसेंबरला रात्री शेतातून चोरून नेल्याने ऐन भरात असलेले गहू आणि हरभऱ्याचे पीक अडचणीत आले आहे. यापूर्वी सुध्दा या चाेरीच्या घटना या भागात घडलेल्या आहेत.
४९७ गट नंबरमधील तीन एकर शेतात ८० किलो हरभरा आणि ४० किलो गव्हाची पेरणी चव्हाण आणि शेजारी असलेल्या शेतकरी मनोहर राठोड यांनीही केलेली आहे. दिग्रस-मानोरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या शेतामधून अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन कृषिपंप चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे अवघड झाले आहे. रब्बी हंगामातील पिके सिंचित करण्यासाठी पोहरादेवी परिसरामधील असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरीवर अनेक विद्युतपंप बसविलेले आहेत. चोरटे पकडले जावे आणि इतर शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे यासाठी पोलीस प्रशासन आणि विशेषतः पोहरादेवी येथे पोलिस चौकीला नियुक्ती असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दखल घेण्याची व रात्रीची गस्त घालण्याची अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कृषिपंप चोरीची ही पहिलीच घटना नसून याच महिन्यात मागील वर्षी लुंबा चव्हाण यांचे शेजारी शेतकरी महेश जाधव, आणि रामदास राठोड या वाईगौळ येथील शेतकर्यांचेही कृषिपंप चोरीस गेलेले असून, ह्या चोरीच्या घटनांची तक्रारसुद्धा त्यावेळी मानोरा पोलिस प्रशासनाने घेतली नसल्याचे संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये आता उमटायला लागल्या आहेत.