लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी ( वाशिम ) : मानोरा तालुक्यातील अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्राजवळ लागवड केलेले टरबूज, खरबुजासह काकडीचे पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरीनदीपात्रात सहा ते आठ फुट खोल खड्डे खोदत त्यातील पाण्याद्वारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. मानोरा-कारंजा मार्गावर असलेल्या अडाण नदीच्या पात्रात पुलाखाली दरवर्षी हिवाळ्याच्या मध्यंतरापासून विविध ठिकाणचे शेतकरी टरबूज, खरबुजासह काकडीच्या पिकाची लागवड करतात. यातून त्यांना बºयापैकी उत्पादनही होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रयोग येथे सुरूच आहे. तथापि, गतवर्षापासून या नदीच्या पात्रात केलेली पेरणी शेतकºयांच्या अंगलट येत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात २०१७ च्या पावसाळ्यात अवर्षणामुळे नदीपात्र हिवाळ्यातच कोरडे पडल्याने या पात्रात लागवड केलेली निम्म्याहून अधिक पिके करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. आता २०१८ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यातही अडाण पात्राच्या क्षेत्रातील पावसाची सरासरी चांगली राहिल्याने या नदीवरील अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आणि पात्रातही दुथडीवर पाणी होते. त्यामुळे यंदा या पात्रातील लागवड शेतकºयांचा फायदा करणार असल्याचे वाटू लागले. तथापि, हिवाळा संपत आला असतानाच या नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे पिके संकटात सापडली.
आता शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी नदीपात्रात सहा ते आठ फुट खोल खड्डे खोदून त्यात झिरपणाºया पाण्याच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयोग शेतकºयांसाठी फायद्याचाही ठरणार आहे, कारण आवश्यक तेवढेच पाणी पिके शोषतील, तर उर्वरित पाण्यापैकी बहुतांश पाणी पुन्हा नदीपात्रात झिरपणार आहे.