ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची पिके संकटात आली आहेत. त्यामुळे शेतक-यांना पिके जगविण्यासाठी पावसाळ्यातही सिंचनाचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र पार्डी ताड परिसरात पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे यंदा मृगाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील पावसाच्या सरासरीत पार्डी ताड आघाडीवर होते. त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंतच या परिसरातील खरीप पेरणी जवळपास आटोपली.
सुरुवातीला पावसाचा जोर असल्यामुळे या कालावधीत पेरणी केलेल्या शेतक-यांचे बियाणे उगवले आणि पिकेही डोलू लागली; परंतु पिके जोर धरत असतानाच पावसाने दडी मारली. गेल्या २० दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ताच नाही. या परिसरातील जवळपास ४०० एकरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, हे पिक पावसाअभावी सुकत असल्याने पाण्याची सोय असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी देत आहेत.