लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.महारेशीम नोंदणी अभियानाचा शुभारंभ वाशिम येथे १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्ररथाच्या आधारे रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यात आली. या अभियानाला जिल्ह्यातील शेतकºयांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि ३० डिसेंबरच्या मुदतीपर्यंत जिल्हाभरातील ४८० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांनी सांगितले. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रोत्साहित करतानाच तांत्रिक मार्गदर्शनही केले. त्यामुळेच शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट ५० एकर असताना ४८० शेतकऱ्यांच्या नोंदणीमुळे ४८० एकर क्षेत्रात अर्थात मुळ उद्दिष्टाच्या जवळपास १० पट क्षेत्रात आता रेशीम शेती होणार आहे. टो येथे रोपनिर्मिती प्रशिक्षणरेशीम शेतीसाठी तुती लागवडीपूर्वी तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी करणाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, हे प्रशिक्षण येत्या आठवड्यात वाशिम तालुक्यातील टो येथे घेतले जाणार आहे. रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकºयांना रोपनिर्मितीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर शेतकºयांना प्रत्यक्ष स्वत:च्या शेतात रोपनिर्मिती करावी लागणार असून, ही रोपनिर्मिती १५ जानेवारीपासून करावी लागणार आहे. रोपनिर्मितीनंतर १५ जून ते १५ जुलैदरम्यान तुती रोप लागवड करावी लागणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वत: रेशिम विकास अधिकारी अरविंद मोरे परिश्रम घेत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशिम शेतीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 2:46 PM