वाशिम: गत काही वर्षांत निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता कोरडवाहू शेतीबाबत शेतकरी शाश्वत राहिले नाहीच शिवाय निव्वळ सिंचनाच्या आधारेही भरघोस उत्पन होण्याचा विश्वास नाही. त्यामुळे शेतकरी संरक्षीत शेतीवर भर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळेच कृषी विभागाच्या शेडनेट योजनेचा फायदा शेतकरी घेत असून, या अंतर्गत आजवर जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात १०० हून अधिक शेडनेट शेतकऱ्यांनी उभारले असून, अद्यापही कृषी विभागाकडे पूर्वसंमतीसाठी शेकडो अर्ज पडून आहेत.
शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला शेडनेट ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला वाशिम जिल्ह्यात उत्स्फू र्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील दीडशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पूर्वसंमतीची प्रक्रिया पार पाडली जाते. या योजनेत शेतकऱ्यांनी शेडनेट उभारल्यानंतर त्यांच्या खात्यात थेट कृषी आयुक्तालय पुणे येथून अनुदानाची रक्कम जमा केली जाते. या योजनेत १९ गुंठे आकाराच्या शेडनसाठी २ लाख ९३ हजार, तर २० गुंठे आकाराच्या शेडनेटसाठी ५ लाख रुपये शासनाकडून अनुदान मिळते. ही योजना अंमलात आणल्यापासून जिल्ह्यात २४८ शेडनेट उभारण्यात आले आहेत, तर चालू आर्थिक वर्षात वाशिम जिल्ह्यात ७९ शेडनेटची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात १, कारंजा तालुक्यात २, मालेगाव तालुक्यात ८, मानोरा तालुक्यात ८, रिसोड तालुक्यात २८ आणि मंगरुळपीर तालुक्यात ३१ शेडनेटचा समावेश आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यातच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसतो. तथापि, शेडनेटच्या उभारणीनंतर वातावरणातील बदल आणि कमी पाण्यातही पिकांचे सरंक्षण करणे शक्य होत असल्याने शेतकरी या योजनेचा आधार घेण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात वाशिम जिल्ह्यात तीनशेपेक्षा अधिक शेडनेट उभारले जाणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मंगरुळपीर तालुका आघाडीवर
वाशिम जिल्ह्यात मागेल त्याला शेडनेट योजनेत मंगरुळपीर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात सद्यस्थितीत पूर्व संमतीसाठी ९३ अर्ज प्राप्त झाले असून, ३७ शेडनेटची कामे सुरू झाल्यानंतर त्यामधील ३१ शेडनेटची कामेही पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्रत्येकी एक एकर क्षेत्राच्या दोन शेडनेटचाही समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे आणि त्यांचे सहकारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करून त्यासाठी पूर्ण सहकार्यही करीत असल्याने येथे या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगरुळपीर तालुक्यानंतर रिसोड येथेही या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, तालुका कृषी अधिकारी रिसोड यांच्या मार्गदर्शनात शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.