कधी काळी शेतकरी बैलांच्या आधारे शेतीवर अधिकाधिक भर देत होेते. त्यावेळी शेतकऱ्यांकडील गुरांची संख्याही अधिक होती. त्यामुळे स्वत:च्या घरी खाण्यासह गुरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्ये मोठ्या प्रमाणात पेरले जायचे. मागील तीन दशकांत मात्र गुरांचा वापर कमी होत गेला आणि यांत्रिक शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिला, तसेच वन्य प्राण्यांचा वैताग वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, ज्वारीकडे पाठ केली. गत तीन वर्षांत जिल्ह्यात २ हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटले असून, आता शेतकऱ्यांनाही विकत घेऊन ज्वारी खावी लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
-------------------------
१) असा घटला ज्वारीचा पेरा (हेक्टर्समध्ये)
२०१७ - २७८०.१५
२०१८ - २५१०.२१
२०१९ - २०६०.००
२०२० - १६४०.००
२०२१ - ७५२.८१
२) यंदा कोणत्या पिकाचा किती पेरा?
पीक पेरा (हेक्टर्समध्ये)
ज्वारी - ७५२.८१
सोयाबीन - ३,०२,६९२.८०
तूर- ६०,०५४.०३
मूग- ३,९५५.८७
उडीद - ६९९४.४७
कपाशी - २१,३६७.३२
---------------
३) का फिरविली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ?
कोट: ज्वारी हे पारंपरिक पीक आता शेतकऱ्यांना परवडणारे राहिले नाही. पिकांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यात वन्य प्राण्यांचा वैताग, तसेच निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे शेतकरी आता ज्वारीची पेरणी करण्यास उत्सुक नाहीत. तथापि, खरीप हंगामातील ज्वारी ही चाऱ्यासाठीच अधिक वापरतात आणि आता यांत्रिक शेतीवर भर असल्याने गुरांची संख्या कमी झाली. परिणामी, चारा पिकांचे क्षेत्र घटले आहे.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
-----------------
४) शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक
१) कोट: ज्वारीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्वारीला हजार रुपयेही मिळत नाहीत. उलट खर्च अधिक असून, वन्य प्राण्यांचाही या पिकाला धोका आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक परवडणारे राहिले नाही. ज्या पिकातून अपेक्षित उत्पन्नच मिळत नसल्याने त्याची पेरणी करून फायदा तरी काय?
-नितीन उपाध्ये, शेतकरी, काजळेश्वर.
---------------
२) वन्य प्राण्यांचा ज्वारीच्या पिकाला मोठा धोका असतो. पूर्वी चाऱ्यासाठी आम्ही ज्वारीची पेरणी करायचो, परंतु या पिकांवर येणारा खर्च, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, उत्पन्नापेक्षा तोटाच अधिक आहे. या उलट सोयाबीनसारख्या पिकावर कमी खर्च येऊनही अधिक उत्पन्न मिळते. आम्ही आता नावापुरतीच ज्वारीची पेरणी करतो.
- नंदकिशोर तोतला, शेतकरी, इंझोरी