वाशिम- जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी वाशिम आणि मानोरा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात ३,९९८ मतदारांपैकी ३८६८ जणांनी मतदानाचा हक्क बजावत ११३ उमेदवारांचे भाग्य 'मतपेटीत'मध्ये बंद केले.
जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यापैकी वाशिम आणि मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. यात वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ५८, तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुकीत ५५ मिळून एकूण ११३ उमेदवार रिंगणात होते. यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत २७०८ मतदारांपैकी निर्धारित ४ वाजताच्या वेळेपर्यंत २६४२ मतदारांनी (९७.५६ टक्के), तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १२८० पैकी १२२६ (९५.७८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत विजयासाठी सहकार क्षेत्रातील राजकीय दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.शनिवारी मतमोजणीवाशिम आणि मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार २९ एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. वाशिम बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी वाशिम बसस्थानकाजवळ कोरोनेशन हॉलमध्ये, तर मानोरा बाजार समितीची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपाहारगृहातच सकाळी ८ वाजतापासून होईल.