लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील विद्यूत ग्राहकांकडे असलेली थकबाकी सद्या कोट्यवधींच्या घरात पोहचली असून ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, विविध स्वरूपातील अडचणींमुळे वसूलीचे प्रमाण अगदीच कमी असून ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर महावितरणला येत असलेले हे अपयश झाकण्यासाठी धडपड सुरू आहे. थकबाकीची माहिती कुठेही उघड न करण्याचा ‘फतवा’ वरिष्ठांकडून जारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून थकबाकीदार ग्राहकांकडे मार्चच्या सुरूवातीला असलेली थकबाकी सुमारे ३० कोटी होती. महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थात ३१ मार्चपर्यंत ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागणार आहे. असे असताना महिन्याभरात वसूलीचे प्रमाण अर्ध्यावरही आलेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले हे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सद्या महावितरणकडून सुरू असून विद्यूत थकबाकी, झालेली वसूली, तात्पुरत्या तथा कायमस्वरूपी खंडित केलेला वीजपुरवठा आदी माहिती कुठेही उघड न करण्याचे फर्मान वरिष्ठांकडून सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वीज बिल भरणा केंद्र रविवारीही राहणार सुरू‘मार्च एन्डींग’मुळे जास्तीत जास्त वसूली व्हावी, यासाठी महावितरणने रविवार, ३१ मार्च या सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यूत थकबाकीची माहिती उघड न करण्याचा ‘फतवा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:14 PM