मंगरुळपीर: यंदा सुरुवातीलाच पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी पेरणीची घाई केली असून, यातील अनेक शेतकर्यांना ही घाई अंगलट येण्याची भिती कृषी विभाग व सुज्ञ शेतकर्यांच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात १३ ते १५ जूनदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे बियाणे जमिनीत दबून कुजण्याची भिती निर्माण झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात यंदा १५ जूनपयर्ंत १७३.00 मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेपयर्ंत केवळ ७३.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी अडीचपट असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी पेरण्याही उरकल्या आहेत; परंतु १३ ते १५ जूनदरम्यान तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या कालावधित केलेल्या पेरण्या उलटण्याची भिती निर्माण झाली आहे. पावसामुळे परेलेले बियाणे जमिनीत दबून कुजण्याची शक्यता अधिक असल्याने १३ ते १५ जूनपयर्ंत पेरणी केलेल्या शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. तालुक्यात साधारण प्रत असलेल्या शेतजमिनीवरील केलेल्या पेरण्यांना मात्र याची फारशी भिती नसल्याचेही कृषीतज्जञांनी म्हटले आहे. तालुक्यात यंदा ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून, त्यापैकी १७ जूनपयर्ंत एकूण ३0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामधील अनेक शेतकर्यांच्या पेरण्या १0 जूननंतरच झालेल्या आहेत. शेतकर्यांनी पेरणी करण्याची घाई करू, नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यात यंदाही सोयाबीन आणि तुरीचा पेरा सर्वाधिक होणार असल्याचे स्पष्ट असले तरी, मुग आणि उडिदाचा पेरा वाढण्याचीही शक्यता आहे.
पेरणीची घाई शेतक-यांच्या अंगलट येण्याची भिती
By admin | Published: June 18, 2017 7:19 PM