लघु पाटबंधारे योजनेंतर्गत गणेशपूर, पाचांबा परिसरामध्ये तीन तलावांची निर्मिती मागील अनेक वर्षांपासून केलेली आहे. या तलावाच्या माध्यमातून शेतीला सिंचनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो; परंतु तलावाच्या भिंतीवर छोट्या झुडपांचे मोठमोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर झाले तरीसुद्धा संबंधित विभागाकडून काेणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. यंदा प्रारंभीपासूनच दमदार पाऊस पडत असल्याने लवकरच तलावातील पाणीसाठा वाढणार आहे; परंतु भिंतीवरील वाढलेल्या मोठमोठ्या झाडांमुळे भिंतीला तडे जाऊन तलाव परिसरातील गावातील ग्रामस्थांना नुकसान होऊ शकते. संबंधित सदर तलावाच्या भिंतीवर झाडे, झुडपे कटाईचे काम थातूरमातूर केल्याने छोट्या झुडपांचे हल्ली मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होऊन आज तलावाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. लघु पाटबंधारे विभागाने तात्काळ सदर कामाकडे लक्ष देत पुढील अनर्थ टाळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोट
परिसरातील तलावाच्या भिंतीवर घनदाट झाडी झाल्याने तलावाच्या भिंतीला तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. लघु पाटबंधारे विभागाने संबंधित कामाकडे लक्ष देत तलावाच्या भिंतीवर वाढलेली झाडे तात्काळ काढावीत.
-विष्णू जाधव, ग्रा.पं. सदस्य, गणेशपूर