लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथे पुरूषांच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, गावातील दारु बंदी लवकरात लवकर न झाल्यास उपवास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गावातील महिलांनी कारंजा पोलीस स्टेशनवर धडक देवून गावातील दारुबंदी करण्यात यावी अन्यथा १८ सप्टेंबर रोजी सामूहिक उपवास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.यावेळी महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक सद्यस्थितीत आधिच आर्थिक संकटात आहे. सततच्या दुष्काळामुळे, झालेले कर्ज, उधार उसनवार, मुलाचे शिक्षण, आजार उपचारावरील खर्च या विवंचनेत राहत असून त्यातच गावात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. परिणामी गावातील पुरुष मंडळी दारू व्यसनाच्या आहारी गेली आहे. थोरा मोठ्यासह लहान मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहे. गावात सुरू असलेली दारू पोलिसांनी त्वरित बंद करावी अशी मागणी केली. याआधी सुध्दा गावातील महिलांनी याबाबत मागणी केली मात्र पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यामूळे गावातील महिलांना सामूहिक उपवास आंदोलन करण्याचा निर्धार केला असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.
दारुबंदीसाठी वापटी कुपटी येथील महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:01 PM