लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २० एप्रिलपासून आरोग्य, कृषी यासह इतरही क्षेत्राला संचारबंदीतून काहीअंशी शिथिलता देण्यात आल्याने, वाशिमसह जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील अत्यावश्यक दुकाने सुरू झाली. दरम्यान, विविध साहित्याच्या खरेदीसाठी वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा येथे नागरिकांची दुकानांसमोर गर्दी झाल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ३ मे पर्यंत संचारबंदी व लॉकडाउन राहणार असून, २० एप्रिलपासून आरोग्य, कृषी यासह इतरही क्षेत्राला संचारबंदीतून काही अंशी शिथिलता देण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी प्रतिष्ठाने, शेतीपयोगी साहित्याची विक्री करणारी प्रतिष्ठाने, धान्य व किराणा, फळे व भाज्या, पशुखाद्य व चारा विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेती व फळबागांसंबंधीची सर्व कामे, शेतामध्ये शेतकरी व शेतमजूरांना शेतीविषयक कामे करण्यास मुभा मिळाली आहे.
कृषी उत्पादने खरेदी करणाºया यंत्रणा तसेच शेतमालाची उद्योगाद्वारे, शेतकºयांद्वारे, शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारे थेट विपणन, हमी भावाने खरेदी करणाºया यंत्रणाची कामेही २० एप्रिलपासून सुरू झाली. दरम्यान, पहिल्याच दिवशी संचारबंदीतून काही अंशी शिथिलता मिळताच, विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये तसेच दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. वाशिम शहरासह मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा येथेही नागरिकांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी दुकानांमध्ये तसेच दुकानांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने २० एप्रिल रोजी केले.