वाशिम : नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सहभागी जिल्ह्यांना १५ ऑक्टाेबर रोजी प्रकल्पात समाविष्ट प्रत्येक गावांत महिला किसान दिनाचे आयोजन करून प्रकल्पातील यशस्वी महिला शेतकऱ्यांचे अनुभव कथन करण्यासह विविध उपक्रम आयोजित करण्याच्या सुचना पोकरा प्रकल्प उपसंचालकांनी १३ ऑक्टाेबर रोजी दिल्या होत्या. तथापि, वाशिम जिल्ह्यात प्रकल्पातील १२९ पैकी केवळ ४३ गावांत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले.पोकरा प्रकल्पांतर्ग राज्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्वं जिल्ह्यात प्रकल्पात सहभागी गावांत १५ ऑक्टाेबर रोजी महिला किसान दिनानिमित्त विविध उप्रकम आयोजित करण्याच्या सुचना पोकराच्या प्रकल्प उपसंचालकांनी दिल्या. यात शेतीशाळा प्रशिक्षकाने केवळ महिलांची शेतीशाळा आयोजित करणे, प्रत्येक गावांत कृषीताईमार्फत महिला शेतकरी, बचतगटांची बैठक आयोजित करून प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती देणे, प्रकल्प गावातील लाभ घेतलेल्या महिला, लाभार्थींचे अनुभव कथन करावयास सांगून समूह सहाय्यकांच्या मदतीने अनुभव कथनाचे व्हिडिओ तयार करणे, आदिवासी भागातील महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सभेचे आयोजन करून विविध घटकांच्या लाभाची माहिती देणे, यशस्वीरित्या पीक उत्पादन घेणाऱ्या महिलांचे अनुभव कथन व चर्चा करणे आणि या कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे आदि सुचनांचा समावेश होता. तथापि, वाशिम जिल्ह्यात या प्रकल्पातील १२० गावांपैकी केवळ ४३ गावांत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने प्रकल्पाच्या प्रसाराविषयक उद्देशाला हरताळच फासला गेला आहे.
वरिष्ठस्तरावरून प्राप्त सुचनांचे पालन करून पोकराअंतर्गत गावात महिला किसान दिनानिमित्त शेतीशाळांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी देणे मात्र शक्य होऊ शकले नाही.-शंकर तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम