रिसोड : तालुक्यातील लोणी बु. येथे फलक लावण्याच्या कारणावरून २० नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजतादरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना पकडण्यात आले. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे हे रिसोड पोलीस व चमूसह गावात तळ ठोकून आहेत.रामभाऊ सखाराम पारवे (७०) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गत सहा महिन्यांपूर्वी गावातील एका मंदिरासमोरील सरकारी जागेत महापुरूषाचे फलक लावण्यात आले होते. या कारणावरून गावातील अनिरूद्ध भिकाजी गाडे, अरविंद मधुकर गाडे, रवी मधुकर गाडे, जीवन जगन गाडे व इतर नागरीक रामभाऊ पारवे यांच्याशी वाद घालत होते. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास रामभाऊ पारवे हे मुलगा ज्ञानदेव पारवे व कैलास साठे यांच्यासोबत घरी येत असताना, जिल्हा परिषद शाळेसमोर अनिरूद्ध गाडे, रवी गाडे, अरविंद गाडे यांच्यासह अन्य काही जणांनी महापुरूषाच्या फलकावरून पारवे यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रामभाऊ पारवे, ज्ञानदेव पारवे, कैलास साठे यांना जबर मारहाण करण्यात आली. जिवाने मारण्याची धमकी दिली. जखमींना रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी रिसोड पोलिसांना तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे तळ ठोकून आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३०७, ३४१, ४५४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ यासह अन्य कलमानुसार १८ जणांवर गुन्हा दाखल केला. तीन आरोपींना पकडण्यात आले असून, संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी सांगितले.
लोणी येथे जुन्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 6:55 PM