गावस्तरावर ग्रामपंचायत निवडणूक हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्याने सत्ताधारी व विरोधक अशा दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागते. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, ग्रामीण भागात राजकारण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाऐवजी स्थानिक आघाडी, पॅनलच्या नावाखाली लढविली जाते. आमदार, सहकार क्षेत्रातील नेते, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्या गावातील लढती नेमक्या कशा होतील, या लढतींचे निकाल कुणाच्या बाजूने लागतील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
००००००००००
आमदारांच्या गावातील लढतीकडे लक्ष
रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या मांगूळझनक (ता.रिसोड) या गावात निवडणूक होत आहे. येथे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांच्या चिखली (ता.रिसोड) या गावातही निवडणूक होत असून, येथे २२ उमेदवार नशीब आजमावत आहेत.
००००
००००००००००
जिल्हा परिषद आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या गावातील लढती
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सर्वश्री दिलीप जाधव यांचे जोडगव्हाण गाव (ता. मालेगाव), उषाताई चौधरी यांचे पार्डीटकमोर (ता.वाशिम), सोनाली जोगदंड यांचे हराळ (ता. रिसोड), जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांचे शिरपूर (ता. मालेगाव), माजी उपाध्यक्ष गजानन लाटे यांचे सवड (ता.रिसोड), विद्यमान सभापती शोभा सुरेश गावंडे यांचे रामतिरथ (ता.मानोरा), पंचायत समिती सभापती गीता संजय हरीमकर यांचे कवठा (ता.रिसोड), उपसभापती सुभाष खरात यांचे पळसखेड (ता.रिसोड), माजी जि.प. सभापती सुधीर पाटील गोळे यांचे केनवड (ता. रिसोड), माजी सभापती सुभाष शिंदे यांचे येवती (ता.रिसोड), माजी सभापती किसनराव मस्के यांचे वारला (ता.वाशिम), माजी पं. स. सभापती वीरेंद्र देशमुख यांचे काटा (ता.वाशिम) आदी ग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
०००००
जिल्हाध्यक्षांच्या गावातील लढती
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांचे चिखली (ता.रिसोड), राकॉंचे माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांचे अनसिंग (ता.वाशिम), शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुधीर कव्हर यांचे तामशी (ता.वाशिम), राकॉंचे माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांचे शेलूखडसे (ता. रिसोड) या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.