वाशिम : कडक निर्बंधाच्या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर राहून आवश्यक कार्यवाही करावी. परवानगी नसलेली दुकाने सुरु असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २० मे रोजी दिले. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासोबत दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे सहभागी होते. तालुकास्तरीय यंत्रणांनी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी नियोजन करावे. ई-पास शिवाय कोणालाही जिल्ह्यात येण्याची अथवा जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी देवू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मे पर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या दरम्यान सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही दुकाने, अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परवानगी नसलेली दुकाने सुरु असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर म्हणाले, जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ करणे आवश्यक आहे. याकरिता तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व संबंधितांना सूचित करून त्याअनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 5:38 PM