वाशिम : वाशिम शहरातील पुसद नाका, रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील खड्डे तसेच अकोला नाका ते काटा रोड या रस्त्यावरील खड्डे बुजवून गैरसोय दूर करा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देताच, येत्या दोन ते तीन दिवसांत ते खड्डे बुजविणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटराव मित्तेवाड यांनी १४ सप्टेंबर रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.
खासदार भावना गवळी यांच्या सूचनेवरून रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान वाशिम शहराबाहेरून गेलेल्या महामार्गावरील खड्डे व पुसद नाक्यावरील खड्डे, रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील खड्डे व अकोला नाका ते काटा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना व रहदारी करणाऱ्या वाहनांना याचा खूप त्रास होत असल्याचे अभियंत्यांना सांगण्यात आले. तसेच गणपती उत्सव, नवदुर्गा उत्सव असल्यामुळे या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. वाशिम शहरातील पुसद नाका गर्दीचे ठिकाण असून तेथे नेहमी नागपूर, पुणे, अमरावती, पुसद, नांदेड व इतर गावी जाणाऱ्या वाहनांची व लोकांची वर्दळ असते. पुसद रोडवर शाळा, महाविद्यालये, दवाखाने, रहिवासी कॉलनी व इतर प्रतिष्ठाने आहेत. ज्यामध्ये आय. यू. डी. पी. कॉलनी, पंचशील नगर, खदान, रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता, महाकाली मंदिर, गजानन महाराज मंदिर आहे. परंतु पुसद नाक्यावर दीड ते दोन फूट खोल अनेक खड्डे पडलेले आहेत. तक्रार केल्यावर त्यामध्ये मुरूम टाकून बुजविण्याचे दयनीय प्रयत्न विभागामार्फत करण्याचे दिसून येते. मात्र, काही दिवसांतच मुरुम उखडून जाते व खड्डे जशाच तसे दिसतात. त्यामुळे खड्ड्यांची कायमस्वरूपी सोय लावणे गरजेचे आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गणेश विसर्जनापूर्वी पुसद नाक्याजवळील खड्ड्यांची कायमस्वरूपी व्यवस्था लावावी. तसेच रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे काम सुरू करावे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, मालेगाव तालुकाप्रमुख उद्धव गोडे, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, उपतालुकाप्रमुख प्रकाश महाले, माजी सभापती विजय खानझोडे, विशाल खंडेलवाल, राजाभैय्या पवार, नारायण गोटे, राजु धोंगडे, ज्ञानेश्वर गोरे, योगेश मते आदी शिवसैनिक चर्चेदरम्यान उपस्थित होते.
०००००
खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील
वाशिम शहरातील पुसद नाका, रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील खड्डे तसेच अकोला नाका ते काटा रोड या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटराव मित्तेवाड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितले.