वाशिम : रिसोड शहरातील मालेगाव नाका ते हिंगोली नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बजुवून शहरवासीयांची गैरसोय दूर करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी २३ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
रिसोड शहरामधून जाणारा तसेच औरंगाबाद-अकोला तसेच अमरावती-नागपूरकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची दुर्दशा व नागरिकांना होणारा त्रास पाहून यापूर्वी नगरसेवकांसह इतरही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. दरम्यान, खासदार भावना गवळी यांनी दखल घेत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता आर. बी. झाल्टे यांना पत्र व दूरध्वनीद्वारे निर्देश देऊन तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या तसेच २३ जुलै रोजी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर यांना सोबत घेऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणीदेखील केल. रस्ता हस्तांतरित प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याकरिता कागदोपत्री प्रक्रिया राबविण्यास सांगून कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरत्या स्वरूपात मुरूम न टाकता जी.एस.बी. मिश्रणाने रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याच्या सूचना गवळी यांनी दिल्या. त्यामुळे लवकरच खड्ड्यांचे साम्राज्य दूर होईल, असा आशावाद शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.
०००००
खड्डेमय रस्त्यांची पाहणी
रिसोड शहरातील खड्डेमय रस्त्यांची पाहणी खासदार भावना गवळी यांनी केली. पावसाळ्याच्या दिवसात खड्डामय रस्त्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. संबंधित यंत्रणांनी वाहनचालकांची गैरसोय दूर व्हावी याकरिता खड्डे बुजवावे, अशा सूचनाही खासदार गवळी यांनी दिल्या. यावेळी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह शिवसैनिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.