लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्रीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) शासकीय कापूस खरेदीला अखेर जिल्ह्यात मुहूर्त मिळाला आणि १९ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर येथील केंद्रावर सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली. बाजारात मिळणारे अल्पदर आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा फटका सहन करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. परिपक्व अवस्थेत आलेल्या या पिकास परतीच्या पावसाचा फटका बसला, तर काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर या पिकाला बोंडअळीने घेरले. त्यामुळे उत्पादनात घट आली. दुसरीकडे शासनाने लांबधाग्याच्या कापसाला ५८२५ रुपये प्रती क्विंटल, तर मध्यम धाग्याच्या कापसाला ५५२५ रुपये प्रती क्विंटल दर घोषीत केला असताना बाजारात व्यापाऱ्यांकडून जेमतेम ५ हजार रुपये प्रती क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात होती. त्यामुळे शेतकरी शासकीय कापूस खरेदीची प्रतीक्षा करू लागले होते. लोकमतने जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेच्या तयारीबाबत वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यात जिल्ह्यात केवळ ३ खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने यंत्रणेवर ताण येणार असल्याचेही नमूद केले अखेर. आता जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीला सीसीआयने गुरुवारी सुरुवात केली. तथापि, मंगरुळपीरमध्येच ही खरेदी सुरू झाली असून. अद्याप कारंजा आणि अनसिंग या ठरलेल्या केंद्रांवर कापूस खरेदी सुरू झाली नाही. मंगरुळपीर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा मंगरुळपीर बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांच्या उपस्थितीत बाजार समिती सचिव रामकृष्ण पाटील, बबन मिसाळ, संजय जाधव, सीसीआयचे प्रतिनिधी उमेश तायडे, जिनिंग-प्रेसिंगचे जुगलकिशोर बियाणी यांच्या उपस्थितीत खरेदीला सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास १०० क्विंटल कापूस मोजण्यात आला.
सीसीआयच्या कापूस खरेदीला मंगरुळपीर येथे सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोजणीचे नियोजन केले असून, एसएमएस पाठवून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस आणण्याच्या सुचना दिल्या जातील. सद्यस्थितीत मंगरुळपीर, कारंजा आणि अनसिंग येथे बाजार समितीत कापसाची नोंदणी केली जात आहे.-उमेश तायडे, सीसीआय केंद्रप्रमूख, मंगरुळपीर