मानोरा : तालुक्यातील धानोरा बु. येथील शेतशिवारातील अडविण्यात आलेला रस्ता अखेर २० जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तात मोकळा करण्यात आला. यामुळे अडीच महिन्यांपासून शेतात पडून असलेले सोयाबीन १७ शेतकऱ्यांना आता घरी आणता येणार आहे. या रस्त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून तालुका प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.मानोरा तालुक्यातील वरोली व धानोरा येथील शेतकऱ्यांचा रस्ता एका जणाने अडविला होता. त्यामुळे १७ शेतकºयांना शेतातील माल घरी आणता येत नव्हता. यासंदर्भात शेतकºयांनी मानोरा तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. सदर रस्ता मोकळा करण्याचे आदेश डॉ. चव्हाण यांनी दिले होते. तथापि, हा रस्ता मोकळा करण्यात आला नव्हता. रस्ता मोकळा करण्यासाठी ठाणेदार शिशिर मानकर यांना पत्र पाठवुन सुचनाही दिल्या होत्या. मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणुक असल्यामुळे बंदोबस्त पुरविण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे शेतकºयांचे सोयाबीन शेतातच पडून होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर २० जानेवारी रोजी पोलिस बंदोबस्तात तसेच ‘इन कॅमेरा’ सदर रस्ता मोकळा केल्याने शेतकºयांचे सोयाबीन घरी नेण्याच्या मार्ग मोकळा झाला. यावेळी मंडळ अधिकारी ए.के. भंडारी, एस.एम. मनवर यांच्यासह बिट जमादार गणेश मिसर, बन्सी चव्हाण, जगन्नाथ घाटे, संगीता मुरादे, पोलिस पाटील अमाले हागे यासह सर्व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अखेर पोलीस बंदोबस्तात धानोरा शेतशिवारातील रस्ता झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 2:34 PM