यशवंत हिवराळे
राजुरा : समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी सुदी संग्राहक तलावातून नेण्यात आलेल्या गौण खनिज खोदकामामुळे राजुरा येथील नारायण भगत यांच्या शेताची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत, समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराला शेत दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, ८ जून रोजीच शेत दुरुस्तीचे कामाला सुरुवात झाल्याने, शेतकरी भगत यांनी ‘लोकमत’चे आभार मानत समाधान व्यक्त केले.
राजुरा येथील शेतकरी नारायण सखाराम भगत यांची गट क्रमांक २०६ मधील एकूण ३.१३ हे.आर शेतजमिनीपैकी १.४२ हे.आर. क्षेत्र पाटबंधारे विभाग वाशिम यांनी सुदी संग्राहक तलावाच्या निर्मितीसाठी गत काही वर्षांपूर्वी संपादित केली होती, तर उर्वरित शेतजमिनीवर ते खरिपासह रब्बीचे पीक चांगल्या प्रकारे घेत होते. मात्र, गत दोन वर्षांपासून परिसरात सुरू असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराद्वारा सुदी संग्राहक तलावाच्या क्षेत्रात खोदकाम करून रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज नेत असताना, भगत यांच्या शेताच्या बांधावर मोठमोठे खड्डे पाडले होते. परिणामी, तलावाचे पाणी शेतात घुसून मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली होती. नुकसान भरपाई मिळण्यासाठी भगत हे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यालयाचे सतत दोन वर्षांपासून उंबरठे झिजवत होते, परंतु त्यांच्या पदरी केवळ आश्वासनाची खैरातच टाकण्यात येत होती. या संदर्भात ‘लोकमत’ने ८ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. याची दखल घेत, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बोरसे यांनी समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराला शेत दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करा, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने तत्काळ शेतजमिनीच्या दुरुस्तीला सुरुवात केल्याने, भगत यांची गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली पायपीट थांबली.
००००
कोट
नुकसानग्रस्त शेताच्या दुरुस्तीसह भरपाईसाठी संबंधितांकडे गेल्या दोन वर्षांपासून पायपीट करत आहे. मात्र, पदरी निराशाच आली. ‘लोकमत’ने माझी व्यथा उजागर करताच, संबंधितांकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने समाधान आहे. ‘लोकमत’चे मनापासून आभार.
- नारायण सखाराम भगत, शेतकरी राजुरा
...
कोट
नारायण भगत यांच्या बाधित शेत दुरुस्तीचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होते. समृद्धी महामार्गाच्या संबंधितांना तत्काळ काम करण्याचे निर्देश दिले व कामाला सुरुवात झाली.
- प्रशांत बोरसे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग वाशिम