वाशिम : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने ओखा- मदुराई- ओखादरम्यान विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अकोला- पूर्णा मार्गावरील महत्त्वाचे आणि जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असतानाही वाशिम स्थानकावर थांबा देण्यात आला नसल्याने संतापाची लाट होती. याबाबत 'लोकमत' ने २ जुलैच्या अंकात ओखा-मदुराई विशेष ट्रेन धावणार; वाशिमात नाही थांबणार अशा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याच दखल घेत या रेल्वेला वाशिम स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय ४ जुलै रोजी घेतला.
दक्षिण मध्य रेल्वेकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक ०९५२० ओखा ते मदुराई विशेष रेल्वे १० ते ३१ जुलै यादरम्यान धावेल. ओखा येथून दर सोमवारी रात्री १० वाजता सुटून मंगळवारी रात्री ११:२८ वाजता पोहचून, गुरुवारी सकाळी ११:४५ वाजता मदुराई येथे पोहोचेल. या गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. तर गाडी क्रमांक ०९५१९ ही विशेष रेल्वे दर शुक्रवारी मदुराई येथून सकाळी (मध्यरात्र) १:१५ वाजता निघून शनिवारी सकाळी ९: २३ मिनिटांनी वाशिम स्थानकावर पोहचून तिसऱ्या दिवशी ओखा येथे रविवारी सकाळी १०:२० मिनिटांनी पोहोचेल.
या रेल्वेगाडीच्यादेखील चार फेऱ्या होणार आहेत. द्वारका, जामनगर, सुरेंदनगर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, भुसावळ, अकोला, पूर्णा, नांदेड, काचीगुडा, निजामाबाद, महेबूबनगर, रेनिगुटा, काटपाडीमार्गे मदुराईदरम्यान अप-डाऊन असा मार्ग राहणार आहे. अकोला- पूर्णा मार्गावरील महत्त्वपूर्ण स्थानक असलेले वाशिम बरोबरच हिंगोली, वसमत स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने हजारो प्रवाशांना या रेल्वेचा उपयोग होणार आहे.