वाशिम : जेमतेम दोन एकर शेतीतून फारसे उत्पन्न हाती पडत नसल्याने स्वत:सह पत्नी आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करताना त्यांची दमछाक होते. मात्र, परिस्थितीपुढे हात न टेकता इतरांच्या शेतात ते मजूरीच्या कामाला जावून स्वाभिमानाने जगतात. एकाच खोलीच्या छोट्याश्या घरात पत्नी व मुलांना घेवून वास्तव्य करणाऱ्या त्याच दत्ता दगडू मोरे (मोतसावंगा) या शेतकऱ्याच्या घराला ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शाॅर्ट सर्किट होवून आग लागली. काटकसरीने घरातील डब्यात ठेवून असलेली ५० हजारांची रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य त्यात जळून खाक झाले.
प्राप्त माहितीनुसार, दत्ता मोरे, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून शेतात सोयाबीन सोंगणीच्या कामाला निघून गेले. अशात ८ वाजेच्या सुमारास घराला आग लागून मोठा धूर निघत असल्याचे शेजारी वास्तव्य करणाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, दरवाजाला कुलूप लावलेले असल्याने आग विझविण्यात अडथळा निर्माण झाला. टिनत्र्याच्या एकाच खोलीचे ते देखील कच्चा स्वरूपातील घर असल्याने आतील सर्व साहित्य काहीच वेळांत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
घरात शाॅर्ट सर्किट होवून घडलेल्या या घटनेत दत्ता मोरे यांच्या पत्नीने एका स्टीलच्या डब्यात ठेवलेल्या ५०० रुपयांच्या १०० नोटा दोन्ही बाजूंनी जळून गेल्या. यासह घरातील सर्व कपडे, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या दत्ता मोरे या शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून प्रशासनाने संबंधितास भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी मोतसावंगा येथील प्रदिप इढोळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.