- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विदर्भातील भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला ९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून १० निष्पाप चिमुकल्यांचा प्राण गेले. या हृदयद्रावक घटनेने शासकीय रुग्णालयांकडून अग्नी व विद्युत सुरक्षेबाबत बाळगण्यात येत असलेली उदासीनता चव्हाट्यावर आली. दरम्यान, सुरक्षेची खबरदारी म्हणून अग्नी व विद्युत सुरक्षेचे तत्काळ अंकेक्षण करून घेण्यासंबंधी शासनाने आदेश दिले; मात्र घटनेला २५ दिवस उलटूनही जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी हा आदेश पाळलेला नाही. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाचाही पाठपुरावा कमी पडल्याचे दिसून येत आहे.भंडारा येथील अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर खासगी व शासकीय रुग्णालयांमधील फायर, इलेक्ट्रिक ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला. जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये असून त्यातील १२४ रुग्णालये एकट्या वाशिम शहरात वसलेली आहेत. यासह एक जिल्हा सामान्य रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, ७ ग्रामीण रुग्णालये, २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत. यातील बहुतांश रुग्णालयांनी दोन्ही प्रकारचे ऑडिट अनेक वर्षांपासून केलेले नव्हते. त्यावर बराच गदारोळ झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लेखी आदेश काढून खासगी व शासकीय रुग्णालयांनी विनाविलंब फायर, इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याचे आदेश काढले; मात्र जिल्ह्यातील ९० टक्के रुग्णालयांनी हा आदेश पायदळी तुडविला असून ऑडिटबाबत उदासीनता बाळगल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांनी विनाविलंब फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या; मात्र अनेक रुग्णालयांनी अंकेक्षण अहवाल प्रशासनाकडे सादर केलेला नाही. यासंबंधी मध्यंतरी प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडला असला तरी या विषयाकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अग्निसुरक्षेचे अंकेक्षण करून घेण्यासंबंधी धानोरा खु. येथील एजन्सीकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. येत्या तीन दिवसांत हे काम सुरू होणार आहे. - डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम