लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम) : आयशर ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दोन विद्यूत खांब उन्मळून पडण्यासोबतच तुटलेल्या विद्यूत तारांच्या घर्षणाने भीषण आग लागली. बुधवार, ३ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सहा शेतकºयांनी स्मशानभूमीलगत साठवून ठेवलेला लाखो रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून भस्मसात झाला. याबाबत अधिक माहिती अशी, की गुरांना लागणारा हिरवा चारा उन्हाळ्यात उपलब्ध होत नसल्याने पुर्वनियोजन म्हणून शेतकरी कडबा, कुटार, गवत साठवून ठेवतात. हा सुका चारा प्रामुख्याने उन्हाळ्यात गुरांचे मुख्य खाद्य म्हणून वापरात आणले जाते. अशाच पाच ते सहा शेतकºयांनी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीलगत चारा साठवून ठेवलेला होता. दरम्यान, ३ एप्रिल रोजी रस्त्याने किन्हीराजा-कवरदरी रस्त्याने चाललेल्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत सिमेंटचे दोन विद्यूत खांब उन्मळून पडले. यामुळे खांबांवरील विद्यूत तारा तुटून ठिणग्या पडल्याने साठवून ठेवलेला संपूर्ण चारा जळून खाक झाला. घटनेची वार्ता कळताच काही गावकºयांनी वाशिम येथील अग्निशमन दलास संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. मात्र, तोपर्यंत अतोनात नुकसान झाले होते. यात संबंधित शेतकºयांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
विद्यूत तारांच्या घर्षणाने लागली आग; लाखो रुपयांचा चारा भस्मसात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 6:02 PM