वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. अंतिम मुदतीपर्यंत प्राप्त अर्जांमधून पहिली लॉटरी सोडत १३ मार्च रोजी स्थानिक समर्थ इंग्लीश स्कूल सुंदरवाटिका येथे काढण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत २४ मार्चपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ खासगी शाळा असून, एकूण ११७३ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी सुरूवातीला १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. २८ फेब्रुवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यातून केवळ ८७५ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर शासनाने प्रवेश अर्ज प्रक्रियेला ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. ७ मार्चपर्यंत ११३४ प्रवेश अर्ज दाखल झाले होते. ७ मार्चनंतर परत एकदा ११ मार्चपर्यंत शासनाने प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. ११ मार्चपर्यंत एकूण ११४९ प्रवेश अर्ज दाखल झाले. वारंवार मुदतवाढ मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात एकूण प्रवेश संख्येऐवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. दरम्यान, शहरातील नामांकित शाळांसाठी विहित जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी १३ मार्च रोजी पहिली लॉटरी सोडत काढण्यात आली. ज्या शाळेत प्रवेश संख्येपेक्षा अधिक अर्ज आले, तेथे लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. लॉटरी सोडत काढल्यानंतर शिक्षण विभागातर्फे पुणे येथे अहवाल पाठविण्यात आला. त्या अनुषंगाने निवड पात्र बालकांची यादी जाहिर करण्यात आली आहे. आवश्यक ते कागदपत्रे घेऊन संबंधित बालकांच्या पालकांनी संबंधित शाळेत २४ मार्चपर्यंत प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.