लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही भागात थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जायची. त्यासाठी लागणारे अंडीपुंज आंध्रप्रदेशातून आणावे लागायचे. ही बाब लक्षात घेऊन टो या गावातील माधव भिवाजी बोरकर या शेतकऱ्याने जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी (रेशीम किटक संगोपन केंद्र) कार्यान्वित केली. त्यास केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर यांच्याकडून रितसर मान्यता मिळाली आहे. यामुळे रेशीम शेती करू इच्छित शेतकऱ्यांना अंडीपुंज तत्काळ उपलब्ध होणार असून वेळ पैशाचा अपव्यय टळणार आहे. सोबतच रेशीम उद्योगासही जिल्ह्यात चालना मिळणार आहे.टो येथील माधव बोरकर या युवा शेतकºयाने गत १० वर्षांपासून रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रीत केले. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी ९० दिवस हैद्राबाद येथे राहून पूर्ण केले. दरम्यान, रेशीम शेती करणाºया शेतकºयांना अंडीपुंज आणण्याकरिता आंध्रप्रदेशात जावे लागते. यात त्यांचा फार मोठा वेळ जाण्यासोबतच पैसे देखील खर्च होतात. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी बोरकर यांनी टो येथे रेशीम किटकाचे संगोपन केंद्र अर्थात रेशीम चौकी सुरू केली. त्यांना केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर यांच्याकडून रेशीम चौकी चालविण्याची मान्यता प्रदान करण्यात आली, त्यामुळे वाशिम जिल्ह्यात रेशीम व्यवसाय करणाºया शेतकºयांना फार सोयीचे झाले. यामुळे शेतकºयांना दोन अवस्थैतील किटक चौकी केंद्रावर तयार करुन मिळतील व पुढे १५ ते २० दिवस रेशीम किटक ांचे संगोपन करताना रेशीम कोशाचे पिक कमी कालावधीत काढणे शक्य होणार आहे. या रेशीम चौकीमुळे रेशीम शेती करणे अत्यंत सोपे होणार आहे. आतापर्यंत रेशीम शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान, अंडीपुंज व प्रशिक्षणाची जवळपास कुठेच सुविधा उपलब्ध नव्हती. आता मात्र ती उपलब्ध झाल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी कार्यान्वित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 2:47 PM