लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : तालुक्यातील ग्राम बिबखेडा येथील रहिवासी गजानन तुकाराम हुंबाड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ८ जुलै रोजी उघडकीस आलेल्या या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी हत्येचा कट रचणाऱ्या हुंबाड यांच्या साळ्यासह पाच आरोपींना ९ जुलैला अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.मृतक गजानन हुंबाड (वय ४० वर्षे) यांच्या स्वत:च्या मालकीचे मालेगाव नाका येथील दुकान संदीप भिकाजी पवार नामक व्यक्तीला भाड्याने दिले होते. घटनेच्या दिवशी पवारने परमेश्वर खडसे या साथीदाराला सोबत घेत हुंबाड यांना एका स्त्रीचे आमिष दाखवून मोटारसायकलवर साखरा फाट्यावर नेले आणि तेथे चार जणांनी मिळून हुंबाड यांचा खात्मा केला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी संदीप भिकाजी पवार, परमेश्वर माधवराव खडसे, उमेश लक्ष्मण वानखडे (सर्व रा. शेलू खडसे) तसेच कट रचल्याप्रकरणी गजानन हुंबाड यांचा साळा ज्ञानेश्वर दिनकर हरकळ व सासरा दिनकर नथ्थुजी हरकळ (रा.गोभणी) अशा पाच आरोपींवर कलम ३०२, २०१, ३४, १२० ‘ब’ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करुन अटक केली आहे; तर या घटनेमधील सहावा आरोपी प्रकाश पंढरी खडसे हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पाचही आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीहुंबाड हत्याकांडप्रकरणी अटक पाचही आरोपींना रिसोडच्या न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. चौकशीअंती या प्रकरणातील नेमके तथ्य समोर येणार आहे.
हुंबाड हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींना अटक
By admin | Published: July 10, 2017 2:07 AM