वाशिम : चौदा वर्षीय वैभव महाले या बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करणार्या मदन वानखेडे याला विद्यमान न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली. मावशीचा एकुलता एक मुलगा वैभव महाले याची हत्या करून मावशीकडे दत्तक जायचे. दत्तक गेल्यानंतर मावशीची पाच एकर जमीन आपल्या नावी करून घ्यायची. असा बेत गेल्या दोन वर्षांपासून मदन वानखेडे याने आपल्या मनामध्ये आखला होता. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अखेर ३ सप्टेंबर या दिवशी मदन वानखेडे याने आपली मावशी व त्यांच्या कुटुंबीयाचा विश्वासघात करून वैभव महाले याला सोबत घेऊन बिटोडा तेली येथील गजानन महाराजांचे दर्शन घेऊन येतो, असे सांगितले. आपल्या आईनेही गजानन महाराजांचे दर्शन घेऊन येण्यासाठी वैभवला अनुमती दिली; परंतु आपल्या भाचाच्या मनातील क्रूर डावाची पुसटशी कल्पनाही तिला आली नाही. महाराजांचे दर्शन घेऊन रात्री उशिरापर्यंंत मुलगा व भाचा का परतले नाही, याची चिंता सतावत होती. गजानन महाराजांचे दर्शन घेण्याआधीच क्रूर नियतीच्या भाच्याने वैभवची जीवनयात्रा संपवून टाकली; परंतु ही बाब वैभवच्या कुटुंबीयांना चार दिवसानंतर कळाली. पोलिसांनी आरोपी मदन वानखेडे याचा कसुन शोध घेऊन त्याला ६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले असता त्याने वैभवची हत्या केल्याची कबुली दिली. वैभवच्या हत्याकांडामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे काय? या सर्व बाबी पोलीस मदनकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ७ सप्टेंबर रोजी न्यायालयाने वानखेडे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार विनायक जाधव यांनी दिली.
हत्येप्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: September 08, 2015 2:10 AM