वाशिम : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा योजनेंतर्गत (इन्फ्रा-२) जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षाच्या काळात त्यापैकी केवळ एकच उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. यासह इतरही अनेक कामे रेंगाळल्याने महावितरणप्रती जनतेतून रोष व्यक्त होत आहे. सद्या पावसाळा सुरू झाला असून खरिप हंगामातील पेरणी आणि त्यानंतर शेतांमध्ये पीके उभी होणार असल्याने किमान चार ते पाच महिने महावितरणला ह्यइन्फ्रा-२ह्णअंतर्गत सुरू असलेली कामे थांबवावी लागणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून रबी हंगामाला प्रारंभ होतो. याच हंगामातील पिकांसाठी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध व्हावी, अशी शेतकर्यांची अपेक्षा असते. मात्र, विद्यूतसंदर्भातील अनेक कामे प्रलंबित असल्याने गतवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या रबी हंगामात शेतकर्यांच्या शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त होणार आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रा-२ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर १0२ कोटी रुपयाच्या निधीतून जिल्ह्यातील अडोळी, देगांव, शिरपूर (खंडाळा), डोंगरकिन्ही, कुर्हा अशा पाचठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या सव्वा ते दीड वर्षाच्या काळात यापैकी केवळ अडोळी येथील विद्यूत उपकेंद्र पूर्णत्वास गेले असून इतर चारही ठिकाणची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यात आठठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर लावण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वाशिम सिव्हील लाईन, मसलापेन, मोप आणि शेलुबाजार या चारठिकाणची कामे पूर्ण झाली; तर पोहा, काकडशिवणी, कामरगांव आणि मानोरा या चारठिकाणची कामे रखडली आहेत. इन्फ्रा-२ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी १0५0 रोहित्र लागणार होती. त्यापैकी आजमितीस उणेपूरे ४७३ रोहित्रांची कामे आटोपली असून इतर ५७७ रोहित्रांची कामे व्हायची बाकी आहेत. एकूणच या सर्व बाबींचा विजपुरवठय़ावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही गंभीर बाब लक्षात घेवून वीज वितरण विभागाने रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पाचपैकी चार वीज उपकेंद्रांची कामे रेंगाळली!
By admin | Published: July 02, 2016 12:06 AM