मानोरा : मानोरा शहरातील व्यापारी अशोक मंत्री यांनी अनेक शेतकर्यांकडून धरोहरवर हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी करून शेतकर्यांना पैसे न देता २९ डिसेंबर रोजी ते घरून निघून गेले होते. १ जानेवारी रोजी सुरेश मंत्री यांनी मानोरा पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती. तेव्हापासून गायब असलेल्या अशोक मंत्री यांना अखेर पाच महिन्यानंतर आज दि.३0 रोजी मसलापेन येथे अटक करण्यात आली. मूळचे शिरपूर जैन येथील रहिवासी असलेले अशोक मंत्री काही वर्षापुर्वी मानोरा येथे वास्तव्यास आले होते. येथे व्यापार करीत असताना शेतकर्यांचा विश्वास संपादन करून अडत दुकान टाकून सोयाबीनची खरेदी सुरू केली. खरेदी केलेले सोयाबीन बुलडाणा अर्बन बँकेच्या मंगरूळपीर येथील वेअर हाऊसमध्ये तारण स्वरूपात ठेवून तेथून कोट्यवधी रूपयाची उचल केली.त्यानंतर ते २९ डिसेंबर २0१३ रोजी घरून निघून गेले. ते घरून निघून गेल्यामुळे ज्यांनी सोयाबीन विकले त्या शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला. त्यांचा भाऊ सुरेश द्वारकादास मंत्री याने १ जानेवारी २0१४ रोजी मानोरा पोलिसात आपला भाऊ अशोक मंत्री घरून निघून गेल्याची तक्रार दिली. त्यामुळे शेतकर्यात धास्ती निर्माण झाली. २८ जानेवारी २0१४ रोजी कोंडोली येथील शेतकरी विजय नानासाहेब देशमुख यांनी मानोरा पोलिसांना अशोक मंत्री, त्याचा भागीदार सतीश पुरणमल राठी व सुरेश द्वारकादास मंत्री यांच्याविरूद्ध तक्रार दिली. मानोरा पोलिसांनी त्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या ४२0,१२0 ब कलमानुसार गुन्हा नोंदवून सतीश राठी यांना २८ जानेवारीला तर सुरेश मंत्री यांना २९ जानेवारीला अटक केली. मात्र,अशोक मंत्री गेल्या पाच महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर आज ३0 रोजी अशोक मंत्री यांना वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी मसलापेन येथे अटक केली व मानोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना चौकशीसाठी कारंजा येथे एसडीपीओ यांच्याकडे नेण्यात आले. अशोक मंत्री यांनी सुमारे ४४ शेतकर्यांकडून धरोहरवर सोयाबीन घेतले. काही शेतकर्यांना धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश वटले नाहीत.
पाच महिन्यानंतर अखेर अशोक मंत्रीला अटक
By admin | Published: May 31, 2014 12:13 AM