मोप, आसोला ते मोहजाबंदी हा रस्ता गत अनेक दिवसांपासून पूर्णत: उखडला असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. असे असताना किमान डागडुजी करण्याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरविलेले नाही. तथापि, रस्त्याच्या समस्येने आधीच त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना आता पुराच्या पाण्याने आसोला व मोहजाबंदी या दोन गावांच्या मध्यभागी असलेला पूलही वाहून गेल्याने अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
रिसोड तालुक्यात शेवटच्या टोकाला असलेला तथा विकासाच्या बाबतीत कायम दुर्लक्षित असलेली मोहजाबंदी, आसोला ही गावे विविध स्वरूपातील समस्यांचा सामना करीत असताना उद्भवलेल्या या नव्या प्रश्नामुळे दळणवळणाची अडचण निर्माण झाली आहे.
...................
कोट :
१७ जून रोजी आसोला, मोहजाबंदी परिसरात धुवाधार पाऊस झाला. या दरम्यान पूरपरिस्थिती निर्माण होऊन पुलावरील रस्ता पूर्णत: खरडला गेला. तेथून वाहने चालविता येणेही कठीण झाले आहे. संबंधित यंत्रणेने रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
- विनोद पाचरणे, आसोला
................
आसोलापासून मोहजाबंदी गावाकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याने खरडल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे किती नुकसान झाले, याची चाचपणी केली जात असून, रस्ता दुरुस्तीचा प्रश्नही लवकरच निकाली काढला जाईल.
- रूपेश चंदे, सहायक अभियंता, सा.बां. उपविभाग, रिसोड