लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर घेवून जाण्यावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी घेतला.यावर्षी जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र बाजूच्या ५ जिल्ह्यांत कमी पाऊस झाल्याने या जिल्ह्यांमधील ३१ तालुक्यांमध्ये मध्यम व गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाशिम जिल्ह्यातील चारा सुरक्षित रहावा, यासाठी जिल्ह्याबाहेर चारा घेवून जाण्यास व बाहेर जिल्ह्यातील गुरांना चराईसाठी प्रवेश करण्यास फौजदारी प्रक्रिया संहीत १९७३ च्या कलम १४४ नुसार निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्यामुळे पशुसाठी आवश्यक चारा, वैरण बाहेरच्या जिल्ह्यात नेण्यास बंदी घालण्यात येत आहे. तसेच इतर लगतच्या जिल्ह्यांमधून चराईकरिता गुरेढोरे वाशिम जिल्ह्यात आणण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले.
वाशिम जिल्ह्याबाहेर चारा घेवून जाण्यावर बंदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 3:13 PM