या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, राज्यात ‘बर्ड फ्लू’ झालेले पक्षी आढळले असले तरी जिल्ह्यात अद्याप अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही. भविष्यातही हा आजार जिल्ह्यात पसरू नये, यासाठी पशुसंवर्धन, आरोग्य, वन आणि लघुपाटबंधारे विभागाने विशेष खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीफार्म चालक, पक्षीपालन करणाऱ्या सर्वांना काय करावे, काय करू नये, याविषयी माहिती द्यावी. जिल्ह्यात कोणत्याही पक्ष्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळल्यास तसेच पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाला किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. पाणवठे, तलावांवर व इतर ठिकाणी पक्ष्यांचे मृत्यू आढळल्यास तातडीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
००००००००००
अफवा पसरवू नका!
‘बर्ड फ्लू’चा प्रसार जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच यासंदर्भात कोणत्याही अफवा पसरवू नयेत अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी या वेळी केले.