आदर्श आचारसंहितेचे पालन करावे
By admin | Published: April 28, 2017 12:39 AM2017-04-28T00:39:15+5:302017-04-28T00:39:15+5:30
महापालिकेच्या पहिल्या सार्र्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणुका पूर्णपणे पारदर्शी व निर्भय
पनवेल : महापालिकेच्या पहिल्या सार्र्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणुका पूर्णपणे पारदर्शी व निर्भय वातावरणामध्ये पार पाडल्या जातील. निवडणुकीदरम्यान सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.
निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माहिती देताना निंबाळकर यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी सुरू आहे. मतदानासाठी ६ विभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन पारदर्शकच असून तीन टप्प्यात उमेदवारांना त्याची खात्री करता येते असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. महापालिकेत निवडणुकीसाठी एक खिडकी तयार केली असून स्वतंत्र माहिती कक्षसुद्धा कार्यरत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.
पूर्वपरवानगीशिवाय प्रचार करणे, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे, पेड न्यूज देणे, मतदारांना आमिषे दाखवणे, खर्चाच्या मर्यादा ओलांडणे याबाबत कुठलाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पोलीस यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक हेसुद्धा सज्ज असतील, असेही यावेळी जाहीर केले आहे. जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा, असे आवाहन आयुक्तांनी शेवटी केले.