वाशिम : कोरोनाबाधितांवर उपचाराबाबत राज्यस्तरावरील डॉक्टरांच्या टास्क फोर्सने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या बैठकीत दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, सचिव डॉ. अमित गंडागुळे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना उपचार करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात, तसेच कोणत्या औषधांचा वापर करावा, या अनुषंगाने राज्यस्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांना त्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सर्वांनी या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या सूचना विचारात घेऊन रुग्णांना कोणते औषध अथवा उपचार सुरू करायचे, याचा निर्णय डॉक्टरांनी घ्यावा. आवश्यकता नसतानाही केवळ रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक आग्रह करतात म्हणून रेमडेसिविर अथवा इतर कोणतेही औषध देणे टाळावे.
रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या वापराबाबतही टास्क फोर्सने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार योग्य वेळी व योग्य प्रमाणातच रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा वापर करावा. रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक व अतिरेकी वापर टाळावा, तसेच ऑक्सिजनचा वापरसुद्धा आवश्यकतेनुसार व अतिशय काळजीपूर्वक करावा. आपल्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सेन्ट्रल लाइनचे ऑडिट करून घेऊन ऑक्सिजनची गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले, तसेच कोरोनाबाधितांवर उपचार करताना शासनाने विहित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने देयके आकारू नयेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आलेल्या अर्जानुसार परवानगी देण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत केली जात आहे. मात्र, जिल्ह्यात परवानगीशिवाय कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येऊ नयेत. रीतसर परवानगी घेऊनच कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करावेत. जिल्हा आरोग्य अधिकारी अहेर यांनी राज्यस्तरीय टास्क फोर्सने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.