वाशिम : २१ फेब्रूवारीपासून सर्वत्र बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेस सुरूवात होत आहे. असे असताना महावितरणकडून विद्यूत उपकेंद्र अतीभारित होण्याचे कारण समोर करून ग्रामीण भागात ८ ते १० तासांचे ‘फोर्स लोडशेडींग’ करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होत असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहे.महावितरणकडून राज्यात कुठेही सद्या विद्यूत भारनियमन केले जात नसले तरी विजेच्या अन्य स्वरूपातील समस्या देखील कमी झालेल्या नाहीत. लोकसंख्येच्या तुलनेत कमी क्षमता असलेली विद्यूत उपकेंद्र, गावठाण फिडरवर क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेल्या जोडण्या, जीर्ण झालेल्या विद्यूत वाहिन्या आदी कारणांमुळे बहुतांश विद्यूत उपकेंद्रांवर अधिकचा ताण ओढवून तांत्रिक बिघाड उद्भवणे, रोहित्र जळून नादुरूस्त होणे आणि त्यामुळे विद्यूत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक अक्षरश: त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळातही हा प्रकार थांबला नसल्याने महावितरणप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे. सद्या हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. यामुळे विद्यूत उपकेंद्रांवर अधिकचा ताण ओढवत असल्याने काही ठिकाणी ‘फोर्स लोडशेडींग’ करावे लागत आहे. असे असले तरी परीक्षा काळात यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम
ऐन परीक्षेच्या तोंडावर विजेचे ‘फोर्स लोडशेडींग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 5:59 PM