वाशिम : गत आठ दिवसांपासून एका जखमी वानराने स्थानिक नवीन आययूडीपी परिसरात हैदोस घातला असून, या वानराला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आले नाही. वन विभागाकडे रेस्क्यू चमू नसल्याने पुसद, अमरावती येथून चमूला बोलाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवीन आययूडीपी परिसरात माकडांनी हैदोस घातल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, गत आठ दिवसांपासून जखमी अवस्थेत असलेल्या एका माकडाने अनेकांच्या घराच्या पायऱ्यांवर तसेच छतावर ठाण मांडल्याने बालकांसह गृहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका महिलेला चावादेखील घेतला असून, या जखमी माकडासंदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली. जिल्ह्यात वन विभागाकडे रेस्क्यू चमू नसल्याने अप्रशिक्षित कर्मचारी नवीन आययुडीपीत येऊन त्या माकडाला इतरत्र हाकलण्याचा प्रयत्न करतात. एका घरावरून दुसऱ्या घरावर गेल्यानंतर परत एक, दोन दिवसाने जखमी वानर घराच्या पायऱ्यावर ठाण मांडते. शनिवारीदेखील हा प्रकार घडला असून, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माकडाला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; मात्र सोबत कोणतेही साहित्य नसल्याने माकडाला पकडण्यात यश आले नाही. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी या वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
००००
जिल्ह्याला रेस्क्यू चमू केव्हा मिळणार?
१ जुलै १९९८ रोजी वाशिम जिल्ह्याची स्थापना झाली असून, २१ वर्षांच्या कालावधीतदेखील वन विभागाकडे रेस्क्यू चमू नाही. यासाठी पुसद, यवतमाळ किंवा अमरावती येथील चमूच्या भरवशावर राहावे लागते. या ठिकाणावरून रेस्क्यू चमू येण्यास बराच विलंब लागतो. त्यामुळे एखाद्यावेळी हिंस्त्र प्राणी शहरात किंवा ग्रामीण भागात शिरल्यास त्याचा बंदोबस्त कसा करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आठ दिवसांपासून एक जखमी वानर पकडण्यात यश येत नसल्याने वन विभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
००००००००००००
कोट
जखमी वानर पकडण्याबाबत कर्मचाऱ्यांना नवीन आययूडीपीत पाठविण्यात आले. हल्ला करण्याची भीती असल्याने वानराला पकडता येत नाही. वन विभागाकडे रेस्क्यू चमू नाही. पुसद किंवा अन्य ठिकाणावरून रेस्क्यू चमूला बोलाविण्यात येईल.
- छत्रपती चव्हाण
वनपरीक्षेत्र अधिकारी, वाशिम.
००००००
कोट
नवीन आययूडीपीतील जखमी माकडला पकडण्याबाबत वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
- सुमंत सोळंकी
उपवनसंरक्षक, वनविभाग वाशिम.
००